नांदेड - येथील गुरूद्वारा तख्त सचखंड बोर्डावर शासनाने सचखंड हजुरी खालसा दिवाणच्या ४ सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राद्वारे जाहीर केली. यात सरदार गुरूचरणसिंघ घडीसाज, सरदार सर्दुलसिंघ फौजी, सरदार भागींदरसिंघ घडीसाज आणि सरदार जगबीरसिंघ शाहु यांचा समावेश आहे.
खालसा दिवाणच्या चार सदस्यांची गुरुद्वारा बोर्डावर नियुक्ती - महाराष्ट्र शासन
शासनाने नांदेड येथील गुरूद्वारा तख्त सचखंड बोर्डावर सचखंड हजुरी खालसा दिवाणच्या ४ सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राद्वारे जाहीर केली.
नांदेडचा सचखंड गुरूद्वारा बोर्ड हा १७ सदस्यांचा असून यापुर्वी शासनाने ९ सदस्यांचा बोर्ड जाहीर केला होता. परंतु, नांदेडच्या सर्व शिख बांधवानी तसेच पंचप्यारे यांनी महाराष्ट्र शासनाच्या कलम ११ ला प्रचंड विरोध करून शासनाने थेट अध्यक्ष नेमू नये, यासाठी आंदोलन केले होते. तशी मागणी देखील शासनाकडे करण्यात आली होती. मात्र, शासनाने यापुर्वी जाहीर केलेल्या राजपत्रात अध्यक्षांची निवड थेट केल्याने शिख बांधवात प्रचंड नाराजी पसरली. हे कलम रद्द करण्यासाठी शिख बांधवानी आता मुख्यमंत्र्याकडे दाद मागण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, गुरूद्वारा तख्त सचखंड बोर्ड नांदेड संस्थेच्या कायदा १९५६ च्या कलम ६ (१) मधील ८ अनुसार महाराष्ट्र शासनाने सचखंड हजुरी खालसा दिवान २२/५१ एफ. ५८३ च्या ४ सदस्यांची नेमणूक शासनाच्या राजपत्रात सोमवारी जाहीर केली. त्यात सरदार गुरूचरणसिंघ घडीसाज, सरदार सर्दुलसिंघ फौजी, सरदार भागींदरसिंघ घडीसाज आणि सरदार जगबीरसिंघ शाहु यांचा समावेश आहे. ही नियुक्ती जाहीर होताच घडीसाज यांच्या घरासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या सर्वांनी पंचप्यारे यांची भेट घेवून दर्शन घेतले.