नांदेड- शंकरनगर येथील गोदावरी मनार चॅरीटेबल ट्रस्ट संचलित साईबाबा विद्यालयातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील चारही शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या पत्रानंतर संस्थेने निलंबित केले आहे. दयानंद राजूळे, सय्यद रसुल, मुख्याध्यापक डी. एस. शेळके व पी. डी. पाटील असे निलंबित केलेल्या त्या चार शिक्षकांची नावे आहेत.
हेही वाचा -अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण; शंकरनगर येथे कडकडीत बंद, साईबाबा विद्यालायवर दगडफेक
शंकरनगर येथे घडलेल्या या घृणास्पद प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघाले आहे. राज्यभरात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर संबंधित शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी पुढे आली होती. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेला याबाबत पत्र पाठवून चारही शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या चारही शिक्षकांना निलंबित करण्यात आले. शंकरनगरच्या साईबाबा विद्यालयातील शिक्षक दयानंद राजूळे व सय्यद रसुल या दोघांनी संबंधित अल्पवयीन मुलीला मोबाईलवर अश्लिल क्लिप दाखवून तिच्यावर अत्याचार केला. यात सदर मुलगी गंभीर जखमी असून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.