नांदेड- शहरालगतच्या आसना नदी परिसरात मांडुळाची तस्करी करण्याच्या बेतात असलेल्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ३ मांडूळ साप हस्तगत करण्यात आले. या सापांची किंमत बाजारात ४ लाख ५० हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अर्धापूर रोडवरील आसना नदी परिसरात काही लोक मांडुळासह वन्य प्राण्यांची तस्करी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या आदेशानुसार मांडुळाची तस्करी करणाऱ्या चार जणांवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. भीमराव उर्फ संतोष बिऱ्हाडे (रा. कारला, तालुका हिमायतनगर), शेख सलमान शेख आजीम (रा. धाटी गुडा, आदिलाबाद), सय्यद(रा. तेहरानगर, नांदेड) आणि अजमत खान समंदर खान पठाण (रा. माजलगाव, बीड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचा नावे आहेत. या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.