नांदेड- लाॅकडाऊन शिथिल झाल्यावर अर्धापूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एकाच आठवड्यात आणि एकाच परिसरात 3 चोरीच्या घटना झाल्याने व्यावसायिकांमध्ये भीतींचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अर्धापूर नांदेड रस्त्यावरील डाॅ. शरद चरखा यांच्या रुग्णालयात आज्ञात चोरट्यांनी चोरी करून रोख सडे अकरा हजार लंपास केल्याची घटना काल रात्री घडली आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
चोरटे सक्रिय झाले आसले तरी गुन्हे अन्वेषण विभाग मात्र थंडच असून शहरात झालेल्या चोरीच्या एकाही घटनेचा शोध लावण्यास अर्धापूर पोलिसांना यश आले नाही. गुन्हे अन्वेषण विभाग नेमके कशाचे अन्वेषण करते हा तपासाचा भाग झाला आहे. अर्धापूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे मोठ्या संख्येने व्यापारी प्रतिष्ठान आहेत. गेल्या 3 महिन्यांपासून लाॅकडाऊन आसल्याने गुन्हेगारी घटनेत घट झाली होती. पण लाॅकडाऊन शिथिल झाल्यावर शहरात चोरटे सक्रिय झाले आहेत. शहरातील बसवेश्वर चौकातील डाॅ. प्रसाद वानखेडे यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.