नांदेड - डॉ. पंजाब भवन कोविड केअर सेंटरमधील 15 तर मुखेड कोविड केअर सेंटर येथील 8 असे एकूण २३ बाधित रूग्ण आज बरे झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आत्तापर्यंत एकूण 209 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आज दिवसभरात चार नवीन रुग्णांची नोंद झाली.
आज सापडलेल्या रुग्णांमध्ये राजनगर येथील एक, रहेमतनगर येथील एक, भगतसिंग रोड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. याचबरोबर पिरबुऱ्हानगर येथील एका 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह झाला आहे. जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 77 अहवालांपैकी 62 अहवाल निगेटिव्ह आले. आजच्या 4 बाधित व्यक्तींमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 301 झाली आहे. पुणे येथून 2 कोरोनाबाधित रूग्ण तसेच मंडई नांदेड येथील रहिवासी असलेली 45 वर्षाची माहिला हैद्राबाद येथून संदर्भीत करण्यात आली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्याची एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 304 एवढी झाली आहे.