नांदेड- लंगर साहीब गुरुद्वारापरिसरातील 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पंजाबमधून आलेल्या 4 वाहन चालकांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर प्रशासनाने लंगरच्या कर्मचाऱ्यांच्या तपासण्या केल्या. त्यात 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 वर पोहोचला असून यापैकी एकाचा उपचारादरम्यान तर एकाचा उपचारानंतर मृत्यू झाला आहे. सध्या 24 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
लॉकडाऊनच्या काळात नांदेडमध्ये लाखो गोर-गरिबांना भोजन पुरवत लंगरसाहीबने सामाजिक भान जोपासले होते. लंगर साहीबच्या तयार जेवणामुळे नांदेडमध्ये गरीबांवर अन्नासाठी दाही दिशा भटकंती करायची वेळ आली नाही. दरम्यान, पंजाबचे जवळपास 4 हजार भाविक नांदेडमध्ये अडकून पडले होते. या भाविकांची देखील सर्व व्यवस्था लंगरसाहिबमध्ये करण्यात आली होती.
या भाविकांना पंजाबात पाठविण्यात आले आहे. त्यांना सोडण्यास गेलेल्या नांदेडच्या चार चालकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच नांदेडहून पंजाबमध्ये परतलेल्या 351 भाविकांना कोरोनाची लागण झाल्याने नांदेड हादरले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लंगर साहिबच्या 97 कर्मचाऱ्यांची काल तपासणी करण्यात आली. त्यातील 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल आहे.