नांदेड- शिकवणीसाठी दुचाकीवरून घराबाहेर गेलेल्या मुलीचे गाडीसह अपहरण करणाऱ्या दोघांविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील यशवंतनगरच्या विस्तारित भागातील रहिवासी गजानन मस्के व भाऊ किशन मस्के यांच्या मुली २२ ऑगस्टला नेहमीप्रमाणे दुचाकीवरून शिकवणीसाठी घराबाहेर गेल्या होत्या. शिकवणीसाठी गजानन यांची मुलगी वर्गात गेली; मात्र, किशन यांची मुलगी शिकवणीला आलीच नाही.
काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर गजानन यांच्या मुलीने हे कुटुंबीयांना सांगितले. बेपत्ता मुलीचा शोध सुरू झाला. परंतु, कोणताही सुगावा लागला नाही. भयभीत झालेल्या बेपत्ता मुलीच्या बहिणीला विश्वासात घेतल्यानंतर, सिध्देश्वर काळे व गंगाधर भोकरे यांनी तिला गाडीसह पळवून नेल्याची माहिती मिळाली. तसेच पळवून नेल्याचे घरी सांगितल्यास वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन दोघेही पसार झाले. हे दोघेही जुना कौठा भागातील रहिवासी आहेत.
गजानन मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३६३, ५०६.३४ अन्वये सिध्देश्वर काळे व गंगाधर भोकरे यांविरुध्द गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक अमृता केंद्रे पुढील तपास करत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.