नांदेड - नांदेडमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईत रस्त्यावर विनाकारण फिरणारी १५० वाहन पोलिसांनी जप्त केली आहेत.
नांदेड लॉकडाऊन : नियमांचे उल्लंघन करत विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाई, १५० वाहने जप्त
नांदेडमध्ये लॉक डाऊन अतसानाही नियमांचे उल्लंघन करत विनाकारण फिरणाऱ्या काही वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत जवळपास १५० वाहने जप्त करण्यात आली असून या वाहनांना पोलीस दलाच्या मुख्यालयात ठेवण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असताना काहीजण नियमांचे उल्लंघन करत रस्त्यावर भरकटताना दिसत आहेत. नांदेडमध्ये विनाकारण फिरणाऱ्या अशाच काही वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करत १५० वाहने जप्त केली आहेत. यातील जप्त केलेली बहुतांश वाहने ही तरुण मंडळींची आहेत. वाहन चालवण्याचा साधा परवाना ही नसलेले युवक लॉक डाऊनमध्ये रस्त्यावर फिरत आहेत, अशी वाहने वाहतूक शाखेने जप्त केली आहेत. विशेष म्हणजे जप्त केलेल्या वाहनात दुचाकी सोबतच ऑटो आणि कारचाही समावेश आहे. जप्त केलेली ही वाहने पोलीस दलाच्या मुख्यालयात लावण्यात आली आहेत.
या वाहन धारकांकडून मोठा दंड वसूल करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांच्या या धाडसी कारवाईचा परिणाम आता जाणवत असून शनिवारी रस्त्यावर वाहनांची तुरळक अशीच संख्या होती. तर, कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून पोलीस राबवत असलेल्या या मोहिमेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.