नांदेड -शहरात कोरोना साथीचा उद्रेक झाला आहे. गेल्या दोन-चार दिवसांपासून हजाराच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. शहरी भागात झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत असताना, कोरोना चाचणी केंद्रांची कमतरता जाणवत होती. मात्र आता ही गरज पूर्ण झाली असून, महापालिकेने उत्तर व दक्षिण नांदेडमध्ये कोरोना चाचणी केंद्रांची संख्या वाढली आहे. नांदेडमध्ये आता 15 नवीन कोरोना चाचणी केंद्र उभारण्यात आले आहेत. याचा फायदा सामान्य जनतेला होणार आहे.
शहरी भागात कोरोनाची साथ झपाट्याने पसरत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने त्याचा ताण नाना-नानी पार्कमध्ये असलेल्या एकाच कोरोना चाचणी केंद्रावर आला होता. केंद्रावर कोरोना चाचणी करून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या रांगा लागायच्या, गर्दी वाढत असल्यामुळे कोरोना संसर्गाचा देखील धोका निर्माण झाला होता. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नांदेडमध्ये कोरोना चाचणी केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे.