महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडच्या 14 वर्षीय कन्येची अमेरिकेत गगनभरारी, कोंढा ग्रामस्थांकडून आनंदोत्सव साजरा - naned flew a plane America

नांदेड जिल्ह्यातील कोंढा येथील जोगदंड कुटुंबातील 14 वर्षीय रेवा हिने अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली आहे. तिच्या या कामगिरीने जोगदंड कुटूंबियासह संपूर्ण कोंढेकर ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरून आला आहे. गावकऱ्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला.

नांदेडच्या 14 वर्षीय कन्येची अमेरिकेत गगनभरारी
नांदेडच्या 14 वर्षीय कन्येची अमेरिकेत गगनभरारी

By

Published : Jun 26, 2021, 6:29 PM IST

Updated : Jun 26, 2021, 7:26 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील कोंढा (ता. अर्धापूर) येथील जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय रेवा हिने दि. २० जून रोजी अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली आहे. तिच्या या कामगिरीने जोगदंड कुटूंबियासह संपूर्ण कोंढेकर ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरून आला आहे. गावकऱ्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही ट्विट करत रेवा जोगदंडला कौतूकाची थाप दिली आहे.

नांदेडच्या 14 वर्षीय कन्येची अमेरिकेत गगनभरारी, कोंढेकर ग्रामस्थांकडून फटाके उडवून आनंद साजरा

२० वर्षांपूर्वी कुटुंब झाले आहे अमेरिकेत स्थायिक
कोंढा येथील रहिवासी असलेले केशवराव बालाजी जोगदंड यांचा मुलगा दिलीप केशवराव जोगदंड हे २० वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी (String Controlled) दोरीवर विमान उडवून दाखविणे या विषयी संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. याचा परिणाम त्यांची मुलगी कु. रेवा दिलीप जोगदंड यांच्या बालमनावर झाला. तेव्हापासून तिने भविष्यात संशोधन क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल सुरू केली आणि एक हे स्वप्न सत्यात उतरले. रेवा जोगदंड (वय १४ वर्षे) यांनी दि. २० जून रोजी चक्क विमान उडवून आकाशात यशस्वी झेप घेतली आहे.

नांदेडच्या 14 वर्षीय कन्येची अमेरिकेत गगनभरारी

ग्रामस्थांकडून आनंदोत्सव साजरा

तिच्या या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन विमान उडविण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरून आला. या परिसरातील अनेक नागरिकांनी त्या मुलीला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून यावेळी आनंदोत्सव साजरा करण्यात आले. तसेच कुटुंबातील सदस्यांचा गावकऱ्यांनी सत्कार केला.

गगनभरारी नंतर चंद्रावर जाण्याची रेवाची जिद्द
तसेच येथील दिलीप जोगदंड यांची कन्या रेवा जोगदंड हिने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत पायलट पदासाठी लागणाऱ्या संपूर्ण चाचण्या पार करून दि. २० जून २०२१ रोजी विमानाची यशस्वी भरारी घेऊन आकाशाला गवसणी घातली आहे. या अभिमानास्पद कामगिरीसाठी तिचे वडील दिलीप जोगदंड, आई वंदना दिलीप जोगदंड यांनी तीला सतत प्रोत्साहन दिले आहे. तिला भविष्यात नासामध्ये जाऊन संशोधन करण्याची इच्छा आहे. त्यासाठी विमान चालविणे आवश्यक असते आणि नासाच्या माध्यमातून चंद्रावर जाण्याची जिद्द आहे, असे कुटुंबियांनी सांगितले.

पालकमंत्री चव्हाण यांनीही दिल्या शुभेच्छा
या यशाबद्दल तिचे अर्धापूर तालुक्यातील सुज्ञ नागरिक, कोंढा येथील गावकरी व जोगदंड परिवाराकडून कौतुक केले जात आहे. त्याबरोबरच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही ट्विट करत अमेरिकेच्या भूमीवर भारताचे नाव उज्वल करणारी नांदेडकन्या रेवा जोगदंड हिचे अभिनंदन केले. तिने याहून मोठी गगनभरारी घ्यावी, यासाठी शुभेच्छा दिल्या.

नेहमीच चर्चेत राहणारे कोंढा गाव
अर्धापूर तालुक्यातील कोंढा हे गाव अतिशय लहान असून येथील व्यवसाय हा शेती आहे. शेतकरी संघटनेच्या चळवळीतील एक अग्रगण्य म्हणून आजही पाहिले जाते. शेती व्यवसायातून येथील काही कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. त्याचबरोबर शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग केले जातात. तर येथील काही नागरिकांनी आधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करून नवनवीन व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी राम कदम या प्रगतीशील शेतकऱ्यांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तिच्या लग्न समारंभात हेलिकॉप्टरमधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. या शाही विवाह सोहळ्याची प्रसार माध्यमांतून मोठी प्रसिद्धी झाली होती. हेलिकॉप्टरनंतर आता विमानभरारी कोंढा हे गाव पून्हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.

हेही वाचा -OBC Reservation : उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांची भाजपच्या आंदोलनाकडे पाठ

Last Updated : Jun 26, 2021, 7:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details