नांदेड -जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु होते. उमरी, लोहा, नांदेड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी येण्यास रात्री दहा वाजले.
नांदेडमध्ये १४ तास चालले मतदान हेही वाचा -साताऱ्यातील नवले गावात नवलाई, घड्याळासमोरील बटन दाबले की मत कमळाला !
सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पावसामुळे सुरुवातीचे जवळपास तीन ते चार तास मोजक्याच मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजाविता आला. त्यानंतर मतदानाचा जोर वाढताना दिसला. परंतु दुपारी एक वाजल्यानंतर अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. त्यामुळे सहा वाजण्याच्या सुमारास रांगेत असलेल्यांनाच मतदानाची संधी मिळणार होती.
हेही वाचा -दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला ! आता निकालाकडे लक्ष
नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, उमरी, लोहा यासह इतर मतदारसंघात सायंकाळी सहाच्या दरम्यान शेकडो मतदार रांगेत होते. रांगेत असलेल्या मतदारांनाच आत घेवून मतदान केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले.उमरीमध्ये तर रात्री दहा वाजेपर्यंत मतदान सुरु होते. त्यामुळे सलग १४ तास मतदानकेंद्रावर असलेले अधिकारी, कर्मचारी चांगलेच वैतागले होते. रविवारी दुपारपासूनच हे कर्मचारी आणि अधिकारी मतदान केंद्रावर दाखल झाले होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी वेळ लागला.