नांदेड- नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता केवळ १४ उमेदवार उभे आहेत. खासदार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणारे शेख यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे.
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी १४ जण रिंगणात; शेवटच्या दिवशी ३१ जणांची माघार
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर युतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर, विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे आणि सपा-बसपा आघाडीचे अब्दुल समद अब्दुल करीम यांच्यात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ५९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ उमेदवाराचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. गुरुवारपर्यंत रिंगणात ५५ उमेदवार होते. गुरुवारी सायंकाळी १० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३१ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात १४ उमेदवार उभे आहेत. उमेदवारांची संख्या जास्त झाल्याने २ मतदान यंत्रे लागतात, की काय, अशी शंका सर्वांना येत होती. मात्र, ३१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता एकाच मतदान यंत्रावर ही निवडणूक होणार असल्याने प्रशासनाने सुस्कारा सोडला. एका मतदान यंत्रावर १५ उमेदवार आणि एक नोटाचे बटन असते. त्यामुळे आता ही निवडणूक एकाच मतदान यंत्रावर होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर युतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर, विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे आणि सपा-बसपा आघाडीचे अब्दुल समद अब्दुल करीम यांच्यात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. येत्या १८ एप्रिलला मतदान होणार आहे.