नांदेड - शहरातील व्यापाऱ्यांचा विरोध केल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने लांबणीवर टाकला आहे. परंतु, आता कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. यासाठी स्वतः जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त व इतर प्रमुख अधिकारी रस्त्यावर उतरल्याचे दिसून येते. यावेळी कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या १३ दुकानांना बुधवारी मनपाच्या पथकाने सील ठोकले. तसेच तोंडावर मास्क न लावणाऱ्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी ३२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात ९ तारखेपासून लॉकडाऊन लागू करण्याचा प्रशासनाचा विचार होता. परंतु, शहरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लॉकडाऊन लागू करू नये, अशी मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तूर्त लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला. परंतु, ५ दिवस सध्याच्या परिस्थितीत कोरोना नियमावलीचे सर्वांनी कडक पालन करावे, तसे न झाल्यास लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर यांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले होते. त्यानुसार मंगळवारपासून शहर व परिसरात कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली. यासाठी महसूल प्रशासनातील प्रमुख अधिकारी तसेच पोलीस विभाग, मनपा, परिवहन विभाग व इतर विभागाचे अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.