नांदेड -नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर वळण रस्त्यावर एका ट्रकमध्ये ६५ ते ७० गायींना कोंबून वाहतूक केली जात होती. हा ट्रक अर्धापूर पोलिसांनी पाठलाग करून पकडला असता ट्रकमधील १० गायींचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मृत गायींना क्रेनच्या सहाय्याने उतरवून अर्धापूर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात दफन करण्यात आले आहे. दरम्यान या घटने नंतर वाहन चालक फरार झाला असून अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली कडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रक क्रं. एम.पी.०९ एच.जी.- १९८६ मधून गायींची वाहतूक होत असल्याचा सुगावा अर्धापूर पोलिसांना लागला. हा ट्रक हिंगोली कडून नांदेडकडे जात असताना अर्धापूर वळण रस्त्यावरील तामसा चौकात कर्तव्यावर असलेले अर्धापूर ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विद्यासागर वैद्य व जमादार परमेश्वर कदम यांनी या ट्रकला अडविण्याचा प्रयत्न केला. ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आल्याने त्याने ट्रक पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.