महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड परिमंडळातील १ लाख ८० हजार वीजग्राहकांनी केला ४५ कोटी रूपयांचा भरणा! - महावितरण वीजबिल

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात दोन टक्के सूट व मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीजबिलाचे तीन हप्ते करून देण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.

mahavitaran
महावितरण

By

Published : Jul 9, 2020, 12:47 PM IST

नांदेड - लॉकडाऊननंतर मीटर रिडिंगप्रमाणे दिलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल अचूक असल्याबाबत नांदेड परिमंडळातील ग्राहकांना वेबिनार, ग्राहक मेळावे, व्हॉटसअ‌ॅप व प्रत्यक्ष संवादाद्वारे माहिती दिली जात आहे. या माध्यमातून देण्यात येणाऱ्या वीजबिलाच्या विश्लेषणावर ग्राहक समाधानी असून, महिनाभरात १ लाख ८० हजार ९१० वीजग्राहकांनी त्यांच्या ४५ कोटी २७ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला आहे. उर्वरित ग्राहकांनीही आपले वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात दोन टक्के सूट व मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीजबिलाचे तीन हप्ते करून देण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. नांदेड परिमंडळात गेल्या पंधरा दिवसांपासून सर्व कार्यालयांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ पुरवून ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे. तसेच ग्राहक मेळावे, वेबिनारचे आयोजन व प्रत्यक्ष संवाद साधत वीजबिलाचे विश्लेषण समजावून सांगण्यात येत आहे. याशिवाय ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संपर्क, ‘एसएमएस’, व्हॉटसअप मेसेज पाठवून बिलासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. जनजागृती मोहिमेला प्रतिसाद देत व वीजबिलाच्या विश्लेषणावर समाधान व्यक्त करत १ जूनपासून आजपर्यंत १ लाख ८० हजार ९१० वीजग्राहकांनी त्यांचे ४५ कोटी २७ लाख रुपयांचे वीजबिल भरले आहे.

एप्रिल महिन्यात केवळ ५९ हजार ६७२ वीजग्राहकांनी १० कोटी २३ लाख तर मे महिन्यात ७८ हजार १५९ ग्राहकांनी १५ कोटी ८२ लाख रुपयांचे वीजबिल भरले होते. त्या तुलनेत जून व जुलै महिन्यात वीजबिल भरण्यास ग्राहकांचा प्रतिसाद वाढला आहे. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी जाहीर केल्याप्रमाणे या ग्राहकांना दोन टक्के सवलतीचा लाभ जुलै महिन्याच्या बिलात मिळेल. याशिवाय लवकर बिल भरणाऱ्या ग्राहकांना नियमित मिळणारी एक टक्के रकमेची सूटही मिळवता येईल. मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीजबिलाचे तीन समान हप्ते करून देण्यात येत आहेत. या सुविधांचा लाभ घेऊन उर्वरित ग्राहकांनी आपले वीजबिल भरून कठीण आर्थिक परिस्थितीत महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता पडळकर यांनी केले आहे.

महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातली शासकीय कंपनी असल्याने ग्राहकाभिमूख सेवा देणे व ग्राहकांचे समाधान यासाठी कटीबध्द आहे. रिडींगनुसार पाठविलेले वीजबिल हे अचूकच आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असून, तक्रारी घेऊन कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांचे समाधान करण्यासाठी महावितरणकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव संपला नसल्याने वीजबिलाची तक्रार घेऊन येण्यापूर्वी ग्राहकांनी महावितरणच्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन एकदातरी आपल्या वीजबिलाची पडताळणी करावी, असे आवाहनही नांदेड परिमंडळाकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details