नागपूर -काल जाहीर झालेल्या नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालात काँग्रेस पक्षाची सरशी झाली आहे. तर इतर सर्वच राजकीय पक्षांना नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे उपराजधानी नागपूर शहरात येत्या काळात वर्चस्वाची लढाई रंगणार हे स्पष्ट झाले आहे. २०२२ वर्षाच्या सुरुवातीलाच नागपूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे भारतीय जनता पार्टीची धाकधूक वाढली आहे. तर गेल्या १५ वर्षांपासून कायम नागपूरच्या स्थानिक राजकारणात बॅकफूटवर पडलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. यावेळी नागपूर मनपामध्ये सत्ता परिवर्तन करू, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना वाटू लागला आहे.
भाजपाला आत्मचिंतनाची गरज
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत १६ पैकी तब्बल ९ तर पंचायत समिती पोटनिवडणुकीत ३१ पैकी २१ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने पुन्हा आपली ताकत वाढवायला सुरुवात केली आहे. तर सलग दोन वेळा जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला पराभव आणि पदवीधर निवडणुकीत मिळालेली मात यामुळे भाजपाला आत्मचिंतन करावे लागणार आहे.