नागपूर - जिल्ह्यातील कामठी येथील पोरवाल कॉलेज परिसरातील सैलाब नगर येथे २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. सौरभ सिद्धार्थ सोमकुवर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभच्या हत्येमागील कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी सौरभची पार्श्वभूमीवर तपासायला सुरवात केली आहे.
नागपूर : वडिलांना बस स्टँडवर सोडून येणाऱ्या तरुणाची भररस्त्यात हत्या - नागपूर बातमी
जिल्यातील कामठी येथील पोरवाल कॉलेज परिसरातील सैलाब नगर येथे २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. सौरभ सिद्धार्थ सोमकुवर असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.
सौरभ हा त्याच्या वडिलांना कामठीच्या बस स्टँडवर सोडायला गेला होता. घरी परतत असताना सैलाब नगरच्या रोडवर आरोपी दबा धरून बसले होते. सौरभ दिसताच आरोपींनी चालत्या गाडीवर धारदार शस्त्रांने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात जखमी सौरभ खाली कोसळला. त्यानंतर आरोपींनी सौरभच्या छाती आणि मानेवर धारधार शस्त्रांने सपासप ९ वार करून त्याला जागीच ठार केले. मृत सौरभवर या आधी सुध्दा दोनदा प्राणघातक हल्ले झाले होते. सौरभच्या हत्येमागील प्राथमिक कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी मृतक सौरभची पार्श्वभूमी तपासायला सुरवात केली आहे. त्याच्या पार्श्वभूमीतच हत्येचे कारण दडले असावे, असा अंदाज पोलिसांचा आहे. याशिवाय पोलीसांनी अनेक मुद्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. ज्या मध्ये पूर्ववैमनस्य, प्रेम प्रकरण आणि पैशाच्या वादातून हत्या झाली का? याचा शोध घेतला जात आहे . दरम्यान मृत सौरभचा मोठा भाऊ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समोर आले आहे.