नागपूर -शहराच्या लगत असलेल्या हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुखदेव देवाजी वरखडे (३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून सुखदेवचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सुखदेवने आत्महत्या केल्याचा बनाव आरोपींनी केला होता. मात्र, पोलीस तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोन संशयितांची चौकशी सुरू आहे अशी हिंगणा पोलिसांनी माहिती दिली आहे.
ओढणीने गळा आवळून केली हत्या -
सुखदेव देवाजी वरखडे, गुमगाव हा मासेमारी करण्यासाठी सोमवारी घरून निघाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. या संदर्भात पोलीस ठाण्यात सुखदेव बेपत्ता झाल्याची सूचना पोलिसांना देण्यात आली होती. सुखदेवचे नातेवाईक त्याचा हिंगणा परिसरात शोध घेत असताना बुधवारी सायंकाळी उशिरा वागधरा-गुमगाव येथील जुन्या बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाऊस जवळ त्याचा मृतदेह आढळून आला. लागलीच याची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. सुखदेवचे दोन्ही हात ओढणीने बांधलेले होते. शिवाय त्याच्या गळ्याला सुद्धा ओढणी गुंडाळलेली होती, यावरून पोलिसांनी सुखदेवची हत्या गळा आवळून केली असावी असे सांगितले आहे.