नागपूर - संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात आणि आता अनलॉकमध्ये सुद्धा आपला वेळ कसा घालवावा, असा प्रश्न तरुणाईला पडला. नागपूरच्या उमरेड तालुक्यात नेहरू युवा केंद्र आणि शिवसाम्राज्य ग्रुपचे स्वयंसेवक मात्र, गेली चार महिने उमरेड शहराच्या गल्ली-बोळांतील भिंतीवर चित्र रेखाटून कोरोना विरोधात जनजागृती करत आहेत. कोणत्याही प्रकारच्या शासकीय मदती शिवाय हे स्वयंसेवक खिशातील पैसे खर्च करून कोरोनाच्या काळात जनतेने कसे वागावे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये कोरोना अक्षरशः धुमाकूळ घातला असताना उमरेड शहरामध्ये केवळ एक रूग्ण आणि तालुक्यात फक्त ३ रुग्णांची नोंद झाली आहे. यामागे या होतकरू तरुणांच्या जनजागृतीचाही वाटा आहे.
गेली चार महिने 'ते' करत आहेत उमरेडमध्ये जनजागृती - उमरेड नेहरू युवा केंद्र न्यूज
नागपूरच्या उमरेड तालुक्यात नेहरू युवा केंद्र आणि शिवसाम्राज्य ग्रुपचे स्वयंसेवक मात्र, गेली चार महिने उमरेड शहराच्या गल्ली-बोळांतील भिंतीवर चित्र रेखाटून कोरोना विरोधात जनजागृती करत आहेत. कोणत्याही प्रकारच्या शासकीय मदती शिवाय हे स्वयंसेवक खिशातील पैसे खर्च करून कोरोनाच्या काळात जनतेने कसे वागावे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
नेहरू युवा केंद्र आणि शिवसाम्राज्य ग्रुपच्या स्वयंसेवकांना एकत्र आणण्याची संकल्पना मोनिष महेंद्र अठ्ठरकर या तरुणाला सुचली. त्यांनतर त्याने २० ते २५ स्वयंसेवकांना एकत्र गाठ बांधत समाज जागृतीचा विषय त्यांच्या समोर मांडला. सर्वांना तो पटल्यानंतर त्यांनी कोरोना जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली. या तरुणांनी चक्क गल्ली-बोळांतील भिंतींवर चित्र, पोस्टर रंगवत समाज प्रबोधनाचे काम केले. आज त्यांच्या या उपक्रमाला चार महिने पूर्ण झाले आहेत. जनजागृती करताना या स्वयंसेवकांनी मास्कचा वापर करा, सतत साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा, सार्वजनिक ठिकाणी योग्य अंतर पाळा, खोकताना-शिंकताना रुमालाने तोंड झाका, आपला परिसरात स्वछता ठेवा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, अशा आशयाचे पोस्टर आणि चित्रे रंगवली.
तरुणांच्या या उपक्रमामुळे नागरिकांना आपण कसे वागलो पाहिजे, याचे ज्ञान मिळाले. महामारीच्या काळात पोलीस, शास्त्रज्ञ, डॉक्टर, आरोग्य सेवक, सफाई कामगार यांचा उत्साह वाढवण्याचा देखील प्रयत्न या तरुणांनी केला आहे. सुरुवातीला खिशातील पैसे खर्च करून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर काही सामाजिक संघटनांनी तरुणांचे कार्य आणि सातत्य बघून त्यांना मदत पुरवली. कोरोना संकटाच्या काळात अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या व काही काळानंतर आल्या पावली मागे देखील फिरल्या. मात्र, या तरुणांनी जनजागृतीच्या कामात सातत्य ठेवून उमरेड तालुक्याला कोरोना मुक्त ठेवण्याचा संकल्प जवळ-जवळ पूर्ण केला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्येही हे स्वयंसेवक पोहचले असून तेथे देखील नवीन स्वयंसेवकांची फौज तयार होत आहे.