नागपूर- मध्यप्रदेशला नागपूरमार्गाने पायी जात असलेल्या एका मजुराच्या पत्नीची नागपुरात प्रसूती झाली आहे. भररस्त्यात प्रसूती कळा येताच अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मदतीला धावल्याने त्या महिलेची रुग्णालयात सुखरुप प्रसूती झाली आहे. सुधा कौल असे त्या महिलेचे नाव आहे.
हेही वाचा-पुण्यात आज दिवसभरात सात कोरोनाबाधितांचा मृत्यू तर 86 नवीन रुग्णांची भर
मुंबईहून मध्यप्रदेशमधील रीवाकडे निघालेल्या 19 वर्षीय सुधा अरुण कौल या महिलेने आठ महिन्याच्या बाळाला जन्म दिला. महिलेला भर रस्त्यात प्रसूती कळा आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुमित सोमय्या व काँग्रेसच्या स्थानिक जिल्हा परिषद सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांनी आपल्या गाडीतून गुमथळ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहचविले. याठिकाणी महिलेने बाळाला जन्म दिला. बाळाचे वजन एक किलो आठशे ग्राम असून सध्या महिलेला नागपूरच्या डागा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हे दाम्पत्य इतर सहकाऱ्यांसोबत रीवाकडे निघाले असताना नागपूर शहराच्या सीमेवर असलेल्या जमठा परिसरात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सुरू असलेल्या भोजन दान केंद्रात जेवण केले. त्यानंतर काही काळ आराम केला. त्याचवेळी सुधा यांना प्रसूती कळा सुरू होताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सुधा यांना रुग्णालयात दाखल केले.
बाळ आणि आईचीही प्रकृती उत्तम आहे. लाॅकडाउनमुळे काम बंद झाल्याने ही गर्भवती महिला मुंबईहून मध्यप्रदेशच्या दिशेने निघाली होती. या महिलेने आपल्या पतीसह अनेक किलोमीटर पायी प्रवास केला आहे.