नागपूर - कळमेश्वर तालुक्यातील झुनकी येथे दुहेरी हत्याकांडने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत एका महिलेची आणि 12 वर्षीय मुलीची निर्घृणपणे हत्या करण्याता आली आहे. रामप्यारी असे 42 वर्षीय मृत महिलेच नाव आहे. तर राणी असे चिमुकल्या मुलीचे नाव आहे. तर राकेश साहू (25) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मृत महिला रामप्यारी ही आरोपी राकेशची सासू असल्याची माहती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली. राकेश मुळचा मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे सर्व तिघे झुनकी गावात एका शेतात चाकरीने राहात होते. मात्र हत्येनंतर आरोपी फरार झाला असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, कळमेश्वरच्या झुनकी भागात श्रावण घोडपागे यांची शेती आहे. त्यांची शेती ललित गजानन गणोरकर यांनी कसायला घेतली होती. दरम्यान चार दिवसांपूर्वी आरोप राकेश साहू हा गणोरकर यांच्याकडे शेतात राहायला जागा देत असाल तर चाकरी करण्यास तयारी दर्शवत काम मागितले. त्यावेळी त्याच्या सोबत 42 वर्षीय रामप्यारी तिची 12 वर्षीय राणी नामक मुलगी या दोघींही होत्या. गणोरकर यांना सालगडी पाहिजेच होता. म्हणून त्यांनी त्याला शेतात राहण्याची परवानगी देत कामावर ठेवून घेतले. त्यावेळी आरोपी राकेशने रामप्यारी ही सासू असल्याचे सांगितले नव्हते. मात्र गणोरकर यांना पत्नी असेल असा समज होता. मात्र, आता या हत्याकांडानंतर ती त्याची सासू असल्याची माहिती समोर येत आहे.
नागपुरात दुहेरी हत्याकांडने खळबळ शेतातील झोपडी झाली रक्तरंजीत-
ललित गणोरकर सोमवारी नेहमी प्रमाणे शेतात गेले तेव्हा त्यांना शेतामध्ये सालगडी दिसून आला नाही त्यामुळे त्यांनी झोपडीत पाहणी करण्यासाठी आतमध्ये डोकावून पाहिले असता, त्यांना हा दुहेरी हत्याकाडांचा धक्कादायक प्रकार दिसून आला. झोपडीत महिला आणि लहान मुलगी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. मात्र राजेश साहूचा कुठेच थांगपत्ता नव्हता. त्यामुळे गणोरकर यांनी तत्काळ या घटनेची माहिती कळमेश्वर पोलिसांना दिली.
दुहेरी हत्याकांडाच्या घडल्याचे कळताच नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जिट्टावार यांचे पथक आणि कळमेश्वरचे ठाणेदार आसिफ रजा शेख, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे, उपनिरीक्षक शरद गायकवाड घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पोलीसांना मिळाला रक्ताने माखलेला दगड आणि हत्यार ....
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, त्यांना रक्ताने माखलेला एका दगड, पावशी आणि दोरी हे साहित्य आढळून आले. प्राथमिक तपासात आरोपीने महिलेला तसेच मुलचा गळा आवळून त्यानंतर शस्त्राचे वार करून हत्या केली असावी, तसेच चेहऱ्यावर दगडानेही ठेचल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी राजेश शाहूविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मृत महिला व तिच्या मुलीच्या संबंधाबाबत आणखी महत्वाच्या बाबी किंवा त्याची पत्नी कुठे आहे, त्याने सासू रामप्यारीला फूस लावून आणले होते. याबाबतही पोलिसांकडून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे. यातील अनेक प्रश्नांचा खुलासा हा संशयिय ओरोपीच्या अटकेनंतर होईल असे सांगितले जात आहे.
संशयित आरोपी मध्यप्रदेशचा, पथक रवाना...
पोलीस पथक आरोपीचे मूळ गाव हे मध्यप्रदेशच्या मंडला जिल्ह्यातील नयनपूर, तिसगावचा असल्याचे समोर येत आहे. तसेच ही घटना रविवारी रात्रीनंतर घडली असावी आणि त्यानंतर तो फरार झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर आरोपी गावाकडे गेला असल्याचा अंदाज बांधत पोलिसांनी त्याच्या शोधासाठी एक पथक मध्यप्रदेशात रवाना केले आहे.
हेही वाचा - साकीनाका बलात्कार प्रकरणी 346 पानांचे दोषारोपत्र दाखल
हेही वाचा - गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला नसल्याचे मुंबई पालिकेचे स्पष्टीकरण