नागपूर- पूर्व विदर्भात झालेल्या पूरस्थितीबाबत वस्तुनिष्ठ पंचनामे करून मदत करणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. पूरस्थिती बाबत नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहीती दिली. शिवाय मदतीबाबत कोणतीही दिरंगाई होणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत आज नागपूर शहरात लोकप्रतिनीधींची बैठक पार पडली. यात जिल्ह्यातील एकूण पूरस्थिती बाबत चर्चा करण्यात आली. शिवाय तालुका निहाय परिस्थिती बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल सादर करण्यात आले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुके व गावांना तातडीची नुकसानभरपाई करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिवाय या स्थितीबाबत प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ पंचनामे करून मदत पोहोचविले जाईल, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
जिल्ह्यातील शेती क्षेत्राला पूराचा फटका बसला आहे. यात ३० हजार हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शिवाय, संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यत ७ ते ८ हजार घरांचे पुरामुळे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भाचा अहवाल लवकरच उपलब्ध होईल, असेही वडेट्टीवार म्हणाले. पुरामुळे जीवितहानी नसली तरी शेती, मत्स्य व्यवसाय, रस्ते, विद्युत पुरवठा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या पुरात एकट्या नागपूर जिल्ह्यात १ हजार ६०० जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे, एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत करणार आहे, असे वडट्टीवार म्हणाले.