नागपूर- नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नियुत्तीनंतर प्रथमच नागपुरात येत असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे विमानतळावर जंगी स्वागत केले. विमानतळावर त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी पोहोचले होते. ढोल-ताशांच्या गजरात पुष्पगुच्छ आणि फुलांचा वर्षाव करण्यात आला.
येथे असलेली गर्दी आणि उत्साह पाहू शकता. महाराष्ट्रात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. याचा अर्थ हाच आहे की, येणाऱ्या दिवसात काँग्रेस एक नंबरचा पक्ष बनणार आहे. हेच येथील जनतेच्या उत्साहावरून दिसून येते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांची चेष्टा करत आहेत. या देशाला आंदोलनातून स्वातंत्र्य मिळाल्याचा इतिहास आहे. मागील अडीच महिन्यांपासून मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. पण, राज्यसभेत ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींनी आंदोलनाची चेष्टा केली. याचा बदला देशाचे शेतकरी मजूर सत्ता बदल करून घेतील हे निश्चित झाले आहे, असे पटोले म्हणाले.