नागपूर -नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात पाणीपुरवठा करणारे 120 टँकर बंद करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. यायामुळे वर्षाला महापालिकेच्या 11 ते 12 कोटी रुपयांची बचत होणार आहे. परंतु, महापालिकेची पाणीपुरवठा समिती व स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
नागपूर शहरात सध्याच्या घडीला 346 टँकरने पाणी पुरवठा केला जातो. शहरातील विविध व खासकरून नव्या वस्त्यांमध्ये जलवाहिन्या नसल्याने त्या वस्त्यांत टँकरने पाणी पुरवठा केला जातो. या टँकर्सवर दरवर्षी महापालिकेचे 28 कोटी रुपये खर्च होतात. मात्र, यापैकी 120 टँकर बंद करण्यात आल्याने दरवर्षी पालिका प्रशासनाची 11 ते 12 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
शहरात जलवाहिनी नसलेल्या भागात शासकीय निधी, अमृत योजना, विशेष निधीच्या माध्यमातून जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात आले आहे. अलीकडच्या काळात महापालिकेच्या 8 झोन अंतर्गत 17 हजार नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या भागातील टँकर्सची मागणी कमी झाली आहे त्या भागातील टँकर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. टँकर बंद करण्याच्या निर्णयामुळे जरी महापालिकेच्या पैशांची बचत होणार असली तरी पाणीपुरवठा समितीला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप पाणीपुरवठा समिती सभापतींनी केला आहे. सोबतच येणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसात पाणी समस्या उद्भवल्यास नागरिकांची पाण्याची समस्या कशी दूर करणार, असा सवाल स्थानिक नगरसेवक करत आहेत.