नागपूर :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काल पडलेली उभी फूट अनपेक्षित होती असे म्हणणे गैर आहे. सर्वांना याबाबत पूर्व कल्पना होती. म्हणूनच शरद पवार यांच्याकडून समजूत काढण्याचे प्रयत्न हे सातत्याने सुरू होते. अजित पवार गेली अनेक वर्षे सत्तेत होते. विविध पदे त्यांनी भूषवली असताना छोट्या मोठ्या गोष्टींवरून पक्षात बंडखोरी करण्यासाठी काही कारण नाही. त्यांना सत्तेत सहभागी व्हायचे होते हे आधीच निश्चित झाले होते. राष्ट्रवादीतील काही नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या शपथविधीवर टीका केली आहे. शरद पवार हे महविकास आघाडी सोबत राहतील असे देखील वडेट्टीवार म्हणाले आहे.
सरकार सुरक्षित करण्याचा प्रयत्न :एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून येणार अधिवेशन शेवटचे असेल असे भाकीत विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. अध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या बाबतीत लवकर निर्णय हा घ्यावाच लागेल. त्यामुळे सरकार सुरक्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले आहेत. पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केला तर स्फोट होईल, काल अनेकांचे चेहरे फसगत झाली असे होते. यामुळे काँग्रेसचे चांगले दिवस आता येतील असे देखील ते म्हणाले आहेत.