नागपूर - भाजपाचे नेते सुधीर मुंगटीवार यांनी राष्ट्रवादीसोबत न गेल्याने पश्चाताप होत असल्याचे म्हटले. त्यावर वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार यांना सत्ता नसल्याचा पश्चाताप होत आहे. कोणा बरोबरही जाऊन सत्ता असण्याची त्यांना आवश्यकता आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांना पश्चाताप होत असल्याची टीका बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
सुधीर मुनगंटीवारांच्या टीकेला वडेट्टीवारांचे उत्तर, म्हणाले 'मुनगंटीवारांना सत्ता नसल्याचा पश्चाताप'
केंद्रात मनमोहनसिंग यांचे सरकार असताना पेट्रोलवर 12 टक्के व्हॅट होता. तो आताच्या सरकारमध्ये 35 टक्के आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आम्हाला उपदेश करण्यापेक्षा केंद्र सरकार ज्या राज्यांना अधिक मदत करते, त्या राज्यांनी व्हॅट कमी करावे असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
सकारात्मक चर्चा -मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात कॅबिनेटच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. सर्वच समाजाला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासंदर्भात सरकार प्रयत्नशील असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले. त्याचप्रमाणे महाज्योती संदर्भात कंत्राटी पद्धतीने 362 जागा भरल्या जाणार आहे. या जागा बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत लवकरच भरल्या जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
अजून मास्क सक्ती नाही -सध्याच्या घडीला कोरोनाच्या परिस्थितीवर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. 90 टक्के लोकांना कुठल्याही प्रकारचे लक्षणं नाही. काही लोकांना सर्दी खोकल्यासारखे लक्षण आहे. त्याला काही फार काळजी करण्याची गरज नाही. भविष्यात काही व्हेरिएंट धोक्याचे ठरू शकतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी, टॉकीज आणि विवाह समारंभ याठिकाणी मास्क घालण्याच्या सूचना दिल्या पाहिजे, अशी चर्चा कॅबिनेटच्या बैठकीत झाली. अजून मास्क सक्ती नाही पण भविष्यात त्यासंदर्भात निर्णय घेऊ, असेही मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.