विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया नागपूर Vijay Vadettiwar On Maratha Reservation : मराठा, ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्यासाठी भाजपा तसंच सत्ताधारी पक्षाचे नेते गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. ते आज नागपुरात आले असता प्रतिनिधींशी संवाद साधत होते. तुम्ही न मागता ईडब्ल्यूएसला दहा टक्के आरक्षण देऊ शकता, तर मग मराठ्यांना आरक्षण का? देऊ शकत नाही, असा सवालही वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना केलाय. मराठा कुणबी वंशावळ सिद्ध होत असेल, तर कुणाचाही विरोध नसावा असं देखील ते म्हणाले. आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्क्यांहून अधिक वाढवायला हवी, अशी मागणी देखील वडेट्टीवारांनी केलीय. उद्यापासून कुणबी समाजासह ओबीसी समाजानं रविवारी नागपुरात या आंदोलनाची घोषणा केली आहे. यामुळं मी स्वत: ओबीसी कार्यकर्ता असल्यानं ओबीसी आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा वडेट्टीवारांनी केलीय.
मी तसं म्हणालो नाही :मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून आरक्षण द्यावं, असं मी म्हटलं नव्हतं, असं स्पष्टीकरण यावेळी वडेट्टीवार यांनी दिलंय. मनोज जरांगे पाटलांना भेटल्यावरही माझी हीच भूमिका होती. सरकारला ओबीसी मते हवीत, पण वाढीव आरक्षण राज्य सरकार का देत नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जनता शरद पवारांच्या पाठीशी :कोणत्याही पक्षाचं चिन्ह गेलं म्हणजे लोक दुसऱ्या पक्षात जात नाहीत. भाजपानं जनतेच्या भावनांशी खेळ सुरू केलाय. त्यामुळं अशा सरकारला जनताच उत्तर देईल. कायद्याचं पालन करून सरकारनं काहीही केलं नाही. मात्र, सरकार सत्तेच्या जोरावर काहीही करू शकतं, असा भाजपाचा समज असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. घड्याळ चिन्ह जाणार नाही, गेल्यास जनता मात्र शरद पवारांच्या पाठींशी खंबीपणे उभी असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केलाय.
जी- 20 फार मोठं आयोजन नाही : दिल्लीत सुरू असलेल्या जी-20 परिषदेसाठी मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रण दिलं नाही, असा प्रश्न वडेट्टीवारांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणले, जी 20 खूप मोठा कार्यक्रम नाही. दरवर्षी एका देशाला यजमानपद मिळतं. मात्र, विरोधी पक्षांना कार्यक्रमांना निमंत्रण न देणं हे हुकूमशाहीचं लक्षण असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- Maratha Vs Kunbi : मराठा विरुद्ध कुणबी संघर्ष पेटणार, कुणबी समाजाची आंदोलनाची हाक
- Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयात टिकेल असं मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न - अजित पवार
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी वकिलाचा आत्महदनाचा प्रयत्न, पाहा व्हिडिओ