नागपूर - तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने मदत देण्याच्या उद्देशाने राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे उद्यापासून (गुरूवार 20 मे ) चार दिवसीय कोकण दौरा करणार आहेत.
तातडीने आघाडी सरकार करणार मदत -
राज्याला 'तौक्ते' चक्रीवादळाच्या तडाख्यात ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो घरांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. वादळाच्या नुकसान भरपाईसाठी निकषाबाहेर जाऊन आघाडी सरकार हे तातडीने मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन वडेट्टीवार यांनी केले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना लवकर मदत कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.