नागपूरVidarbhavadi Agitation: वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते आज (सोमवारी) आक्रमक झाले होते. (Demand for separate Vidarbha) विदर्भावाद्यांनी नागपूरच्या संविधान चौकात ''रास्ता रोको'' आंदोलन करत संपूर्ण रस्ता रोखून धरला होता. परिणामी, वाहतूक कोंडी सदृश परिस्थिती निर्माण झाली. ज्यामध्ये काही रुग्णवाहिका देखील अडकल्यानं रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर तासाभराच्या गोंधळानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना हटवल्यानं मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.
विदर्भाच्या नावावर राजकारण झाल्याचा आरोप:केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात विदर्भवाद्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एखाद्या राज्याची निर्मिती करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. भाजपाच्या नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुढे करत त्यावर राजकारण केल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या विदर्भवाद्यांनी केलाय. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार वामनराव चटप यांनी केलं.
विदर्भवादी आक्रमक, पोलीस बघ्याच्या भूमिकेत:गेल्या काही दिवसांपासून वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकात आंदोलन करत आहेत. आज अचानक आंदोलनात सहभागी झालेले विदर्भ समर्थक आक्रमक झाले होते. मात्र, या संपूर्ण घडामोडी घडत असताना पोलीस प्रशासन कमालीचं सुस्त दिसून येत होतं. सुमारे तासभर विदर्भवाद्यांनी नागपुरकारांना वेठीस धरल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली. काही अधिकारी पाय मोजत आंदोलन स्थळी दाखल झाले. त्यानंतर बऱ्याच वेळानं लोकांना हटवण्यासाठी आवश्यक कुमत मागविण्यात आली होती.