नागपूर - लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलाविरोधात आज विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपूरच्या संविधान चौकात जोरदार आंदोलन केले. त्यानंतर आंदोलकांनी आपला थेट मोर्चा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराकडे वळवल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी पोलिसांनी मोर्चा कडबी चौकात अडवून धरत आंदोलकांना ताब्यात घेतले.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालण्यासाठी निघालेल्या मोर्चाला संविधान चौकातून सुरूवात झाली. संपूर्ण विदर्भातील कार्यकर्ते माजी आमदार वामनराव चटप आणि राम नेवले यांच्या नेतृत्वात या ठिकाणी जमले होते. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीज बिले आली होती. ते वीज बिल माफ करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येत होती. या शिवाय वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणासुद्धा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या. मोर्चाचे आक्रमक स्वरूप बघता पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावला होता.
आंदोलक ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराकडे निघाल्यानंतर पोलिसांनी सर्वाना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. तेव्हा आंदोलकांनी याला तीव्र विरोध केला. यात आंदोलन आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली.
विदर्भावाद्यांचे ऊर्जा विभागावर गंभीर आरोप
राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पंपाचे हार्स पावर कागदावरच वाढवून शेतकन्यांकडून महावितरणने २२ हजार कोटी रुपये जास्तीचे वीज बिल वसूल केले असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.