नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. यामध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठान पणाला लागली आहे. ज्यामध्ये विद्यमान खासदारांचा देखील समावेश आहे. पहिल्या टप्यातील मतदान ११ एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीचे अनेक प्रस्थापित आणि नव्या उमेदवारांमध्ये लढत आहे. विदर्भात कोण कोणाविरोधात लढत आहे. यांचा घेतलेला हा आढावा...
नागपूर
नागपूर लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचारात अक्षरशः दिवस-रात्र एक केली आहे. नागपूरचा गड राखने हे गडकरींसाठी आव्हान आहे. तर भाजपातून नुकतेच काँग्रेसवासी झालेले नाना पटोले यांनी सुद्धा मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. त्यामुळे पटोले यांना गडकरींच्या विजयाचा रथ रोखण्याचा विश्वास आहे. गडकरी संघ भूमीचे प्रतिनिधित्व करत असल्याने, त्यांच्या मागे संघ ताकतीने उभा आहे. मात्र, नागपुरात गटा-तटात विभागलेले काँग्रेस नेते नानांच्या मागे एक दिलाने उभे राहिल्याने, नानाचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.
वर्धा
वर्धा लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध काँग्रेस पक्षाचे उमेदवार चारुलता टोकस यांच्यात खरी लढाई दिसून येत आहे. २०१४ च्या निवडणुकीत रामदास तडस मोदी लाटेत स्वार झाल्याने त्यांनी २ लाख १५ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, यावेळी चारूलता टोकस यांच्याशी त्यांची लढत होत आहे. टोकस हे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे रामदास तडस यांच्यासमोर तगडे आव्हान आहे. वर्धा लोकसभेसाठी शहरी भागात भाजप मजबूत असली तरी ग्रामीण भागात काँग्रेसने मुसंडी मारण्याची शक्यता आहे.