नागपूर - खरेदी केलेल्या भाजी व साहित्याचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी भाजी विक्रेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बुधवारी घडली. सदर घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून नंदनवन पोलिसांनी अक्षय करोदे नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
मोहम्मद असिफ शेखच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद - mohammad asif sheikh
खरेदी केलेल्या भाजी व साहित्याचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी भाजी विक्रेता मोहम्मद असिफ शेखवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बुधवारी घडली. सदर घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
नंदनवन पोलीस ठाणे हद्दीतील हसनबाग रोडवर मोहम्मद असिफ शेख भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास आरोपी अक्षय करोदे त्याच्या इतर २ साथीदारांसह असिफ शेख यांच्या दुकानात आला. त्याने भाजीचे साहित्य खरेदी केले आणि पैसे न देताच ते दुकानातून निघाले. यावर असिफ शेख यांनी हटकल्यावर तिघांनीही असिफ शेख व त्यांचा मित्र मोहम्मद इम्रान यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार केल्याने या हल्ल्यात मोहम्मद असिफ शेख यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर तिघेही आरोपी एकाच दुचाकीवरून पळून जात असल्याचे परिसरातील सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. असिफच्या हत्येप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपी अक्षय करोदे याला अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.