नागपूर - कोरोनाच्या काळात आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आहारात भाज्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. मात्र, सध्या भाज्यांचे दर कडाडले असून नागपुरात भाज्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे भाजी खरेदी करताना ग्राहकांसमोर मोठा प्रश्न उपस्थित होत असल्याचे पहायला मिळत आहे. शहरातील गोकुळपेठ बाजारपेठेतही सध्या मोजकेच ग्राहक दिसत आहेत. तर, दुसरीकडे मुसळधार पावसाचा परिणाम भाज्यांच्या दर वाढीवर झाल्याचे भाजीविक्रेत्यांचे मत आहे. अशावेळी भाज्यांचे वाढलेले दर अनेकांना न परवडणारे ठरत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या आहारात भाज्यांचा जास्तीत जास्त समावेश करत आहे. अशातच भाज्यांचे दर वाढल्यामुळे नागरिकांकडून मोजक्याच भाज्यांची खरेदी केली जात आहे. सध्या, शहरातील मुख्य बाजारपेठांसह छोट्या बाजारपेठेतही मोजकेच ग्राहक दिसून येत आहेत. शिवाय भाज्यांच्या दरात तब्बल दुपटीने फरक पडल्याचे ग्राहक व भाजीविक्रेत्यांचे मत आहे. अशावेळी सर्वसामान्य माणसाला भाजीखरेदी करताना अधिकचा अर्थिक फटका बसत आहे. तर, दुसरीकडे बाजारपेठेत भाज्यांची आवकच कमी झाल्याने हे दर वाढल्याचे भाजीविक्रेत्यांचे मत आहे. शिवाय यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे भाज्या शेतातून बाजारपेठेत येऊच शकल्या नाही. त्यामुळेही हे दर गगनाला भिडले असल्याची प्रतिक्रिया भाजीविक्रेत्यांनी दिली आहे.