नागपूर :राज्यभर गाजत असलेल्या शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा पोलीस प्रयत्न करत असताना काही संशयीतांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहे. मात्र, दुसरीकडे ठाकरे गटाचे युवानेते वरूण सरदेसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात खरा सूत्रधार आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे हा आहे. ते नागपुरात माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
काय म्हणाले वरुण सरदेसाई : वरूण सरदेसाई म्हणाले की, मला जेवढी माहिती मिळाली आहे, त्यानुसार व्हिडीओमध्ये दिसत असलेले आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे संपूर्ण प्रकरणाच्या मागील सूत्रधार आहेत. राज सुर्वे यानेच संपूर्ण व्हिडिओ त्याच्या फेसबुक पेजवर लाईव्ह केला होता. त्यामुळे प्रकरणी पोलिसांनी राज सुर्वेला अटक केली पाहिजे, असे वरुण सरदेसाई म्हणाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तळाशी जाण्यास मुंबई पोलीस सक्षम आहे, असे देखील ते म्हणाले आहेत.
वरूण सरदेसाईंचा गौप्यस्फोट :संपूर्ण व्हिडिओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच बनवला आहे असा दावाही सरदेसाई यांनी केला आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ केलेला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करताना खरा व्हिडीओ समोर आला पाहिजे, अशी मागणी वरुण सरदेसाईंनी केली आहे.