नागपूर -गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड प्रकरणात नागपूर खंडपीठाने तेलुगू कवी वरवरा राव यांना प्रकृतीच्या कारणामुळे सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य पीठाने जामीन मंजूर केल्याच्या आधारावर नागपूर खंडपीठाने राव यांचा जामीन मंजूर केल्याचे विधी तज्ज्ञांनी सांगितले. कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली कारागृहात असलेले ८२ वर्षीय राव यांना प्रकृतीच्या कारणामुळे काल (सोमवारी) मुंबई उच्च न्यायालयाकडून सहा महिन्यांसाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर आज नागपूर खंडपीठानेही त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला.
जामीन मिळालेले पहिलेच आरोपी -
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील एकूण १६ आरोपींपैकी जामिनाचा दिलासा मिळणारे राव हे पहिलेच आरोपी आहेत. राव यांना विविध आजार झाले आहेत. त्यांची प्रकृती बिघडत आहे. नवी मुंबईतील तळोजा तुरुंगातील रुग्णालयात योग्य उपचार त्यांना मिळाले नाहीत या कारणाखाली राव व त्यांच्या पत्नी हेमलता यांनी दाखल केलल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला. यानंतर राव यांना विलेपार्ले येथील नानावटी खासगी रुग्णालयात १९ नोव्हेंबरला हलवण्यात आले होते. तेव्हापासून राव नानावटीमध्येच आहेत.