तोडफोडीच्या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद नागपूरVandalism In Beer Bar : शहरातील वाडी पोलीस ठाणे हद्दीतील रोहित बारमध्ये गुंडांच्या टोळक्यांनी तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. (beatings of employees) संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गुंडांनी शस्त्राचा धाक दाखवत बारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. रात्री उशिरा कर्मचाऱ्यांनी वाडी पोलीस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
गुंडांची कर्मचाऱ्यांना मारहाण :बारमध्ये तोडफोड करण्याची घटना ही काल दुपारच्या सुमारास घडली आहे. हातात शस्त्र घेऊन चार गुंड बारमध्ये घुसले. सुरुवातीला ते कर्मचाऱ्यांना धमकावत होते. त्यानंतर त्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी बारमध्ये बसलेल्या ग्राहकांना धमकी देत बाहेर जाण्यास सांगितले. बारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गुंडांना थांबवण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा त्या गुंडांनी कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली. ज्यामध्ये दोन कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद :बारमध्ये तोडफोड करत चार गुंड हैदोस घालत असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्या आधारे कर्मचाऱ्यांनी थेट वाडी पोलीस स्टेशन गाठून गुंडा विरोधात तक्रार दाखल केलीय. वाडी पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
गणेशपेठ हद्दीतील बारमध्ये तोडफोड :वाडीच्या रोहित बारमध्ये गुंडांनी तोडफोड केली तशीच एक घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यामुळे नागपूर शहरात भीतीचं वातावरण आहे. नागपुरातील बारमध्ये गुंडांनी तोडफोड केल्याची घटना काही नवीन नाही. यापूर्वीही बिलाच्या वादातून किंवा इतर कारणावरून गुंडांनी बारमध्ये तोडफोड करत तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती.
गुंडांची हॉटेलमध्ये तोडफोड :शस्त्राच्या धाकावर हॉटेलमध्ये तोडफोड केल्याची अशी एक घटना ठाण्यातील एका हॉटेलमध्ये घडली होती. यात घोडबंदर रोड येथे ब्रह्मांड आझाद नगर भागात असलेल्या गोल्डन हिलटॉप नामक हॉटेलमध्ये 23 नोव्हेंबर, 2023 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास तीन व्यक्तींनी हॉटेलच्या वेटर आणि कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला होता. हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे हल्लेखोर हातात धारदार शस्त्रे घेऊन हल्ला करत असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं.
हॉटेल स्टाफवर चॉपरने हल्ला : घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड आझादनगर येथे सागर गोल्डन हिलटॉप नावाचं हॉटेल आहे. 23 नोव्हेंबरला रात्री ओंकार भोसले आणि त्याचा मित्र अभी पाटील हे मद्यपान आणि जेवण करण्यासाठी या हॉटेलमध्ये आले होते. दरम्यान वेटरला त्यांची ऑर्डर घेण्यास वेळ लागला. यामुळे संतापलेल्या ओंकार भोसले याने बसलेले टेबल उलटून लावले आणि त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हॉटेल व्यवस्थापनाकडून मिळालेल्या स्पष्टीकरणावर नाराजी व्यक्त करत दोन्ही आरोपींनी चक्क चॉपर घेऊन तेथील वेटर आणि कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. यात एका वेटर आणि इतर कर्मचाऱ्याला दुखापत झाली असून त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. याबाबतचा गुन्हा कासारवडवली पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात आला. मात्र, आरोपींना शोधण्यात अजून तरी पोलिसांना यश आलेलं नाही.
हेही वाचा:
- साईचरणी 10 दिवसात 16 कोटी रुपयांचं दान, 8 लाख साईभक्तांनी घेतलं दर्शन
- रोहित पवारांच्या अडचणी वाढल्या, बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी
- भर हिवाळ्यात पावसाचं थैमान; शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास गेला, पाहा व्हिडिओ