नागपूर -नरखेड तालुक्यातील अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणाला राजकीय रंग चढत आहे. या प्रकरणात आता वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भीम आर्मी अशी राजकीय लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्य सरकारचे दोन मंत्री अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर अरविंदच्या मृत्यूचे वंचित राजकारण करत असल्याचा आरोप भीम आर्मीतर्फे करण्यात आला आहे.
अरविंद बनसोड संशयित मृत्यू प्रकरणातील मुख्य साक्षीदार व मृत अरविंदचा मित्र गजानन राऊत हा वारंवार साक्ष बदलत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनीही गजानन राऊत याला साक्षीदाराऐवजी आरोपी करून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अरविंद बनसोडच्या मृत्यूचे वंचित बहुजन आघाडी राजकारण करत आहे. ते या खटल्याच्या मध्यवर्ती भूमिकेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भीम आर्मीच्यावतीने करण्यात आला आहे. गजानन राऊत हा या खटल्यात मुख्य साक्षीदार असून त्याला भीम आर्मी पूर्ण संरक्षण देणार असल्याचेही भीम आर्मीतर्फे सांगण्यात आले. दोन्ही पक्षांच्या या लढाईत अरविंद बनसोड यांचे कुटुंबीय मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.