नागपूर :पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, यावरून इंडिया आघाडीमध्ये संघर्ष सुरू आहे. प्रत्येक पक्षाचे नेते पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहेत. पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मजबूत आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी 2024 मध्ये आम्ही 350 पेक्षा जास्त जागा जिंकू, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. कांद्याला चांगला भाव मिळावा, ही अनेक दिवसांची मागणी आहे. 'महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकतो कांदा आणि महाविकास आघाडीचा झाला वांदा' या शब्दांत सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीय. राहुल गांधींच्या नादाला शरद पवारांनी लागू नये, असं देखील ते म्हणाले आहे.
शिर्डीतून निवडणूक लढण्यास इच्छुक :आरपीआयला २ जागा महायुतीमध्ये मिळाल्या आणि त्या निवडून आल्या तर आम्हाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल. शिर्डीमधील लोकांची इच्छा आहे, की मला त्या ठिकाणी संधी मिळावी. माझीसुद्धा शिर्डीमधून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा आहे. इंडिया आघाडी 'निगेटिव्ह' आघाडी आहे. राहुल गांधींनी ओढून ताणून हे नाव ठेवले आहे, असे नाव ठेवणे योग्य नाही. ही आघाडी चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे. नरेंद्र मोदींसमोर टिकाव लागणं अशक्य आहे. इंडिया आघाडीमध्ये केजरीवाल जातील की नाही, हे सांगता येत नाही. जनता आमच्या सोबत आहे असं ते म्हणाले.