केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाबाहेरून ईटीव्ही भारतचा आढावा नागपूर : बंगलोर येथील एका तरुणीच्या मोबाईलवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन कॉल करण्यात आले असल्याची माहिती झोन-2चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे. धक्कादायक माहिती म्हणजे ज्या तरुणीच्या मोबाईलवरून फोन आल्याचं उघड झाले आहे, त्या तरूणीने फोन केला नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. तरीही त्या तरुणीचा एक मित्र जयेश कांथा उर्फ पुजारी ज्या कारागृहात बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतले असून, त्या अनुषंगाने तपास सुरू झाला आहे.
पोलीस तपास सुरू - नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जयेश पुजारी नावाच्या एका व्यक्तीचे तीन कॉल केले होते. हा नंबर मंगळुरू येथील एका महिलेचा असल्याचे आढळून आले आहे. आम्ही तिच्याशी देखील संपर्क साधला आहे. कॉल तिच्या मैत्रिणीने किंवा जयेश पुजारीने केला होता का? हे आम्ही शोधत आहोत, अशी माहिती नागपूरचे डीसीपी राहुल मदने यांनी दिली आहे. तसेच मी धमकी दिली नसल्याची माहिती पुजारीने पोलिसांना दिली आहे. तसेच आपण 10 कोटींची मागणी केल्याची माहिती पुजारीने पोलिसांना दिली असल्याची माहिती डीसीपी यांनी दिली.
खोडसाळपणा तर नाही : गेल्या 2 महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दोन वेळा धमकीचे कॉल आले आहेत. यावेळीही जयेश कांथा उर्फ पुजारी नावाने धमकी आल्यामुळे कुणी खोडसाळपणा तर करत नाही ना या दृष्टीने देखील तपास केला जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.
सकाळी काही वेळात तीन कॉल : आज सकाळी धमकीचे तीन कॉल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आले. पहिल्या कॉलवर कोणतेही संभाषण झाले नाही. मात्र, त्यानंतरच्या दोन कॉलवर बोलताना आरोपीने दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. गेल्यावेळी पोलिसांनी माहिती दिली होती. मात्र, यावेळी तसं करू नका असे देखील आरोपी फोनवर म्हणाला आहे.
ऑफिस, निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ : धमकीचे तीन फोन आल्यानंतर नितीन गडकरी यांचे नागपूरातील निवासस्थान व जनसंपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्तात मोठी करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी 14 जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याच्या धमकीचे तीन फोन आले होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज संध्याकाळी नागपूरला येणार आहेत. ते संध्याकाळी जी- 20 च्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
खोटी पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरोधात तक्रार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संदर्भात खोटी आणि जातिवाचक पोस्ट महाराष्ट्रातील अनेक व्हॉट्सअँप ग्रूपवर पसरवली जात आहे, या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दत्तात्रय जोशी नामक व्यक्तीची विरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून, अशी खोटी पोस्ट लिहिणाऱ्यांवर आणि ती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती सायबर पोलीसांना करण्यात आली आहे.
हेही वाचा :Nagpur News: संपाचा 'या' रूग्णालयाला बसला मोठा फटका; सहा दिवसांत 109 रुग्णांचा मृत्यू