नागपूर- रखडलेल्या कामांना किंबहुना रद्द झालेल्या प्रकल्पाला पुन्हा सुरू करायचे असले तर आमदारांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरणे गरजेचे आहे. शिवाय सरकार म्हणजे 'खटे बैल' आहे. त्याला वेळोवेळी टोचण द्यावे लागते, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात पार पडलेल्या पदवीधर निवडणूक मेळाव्यादरम्यान ते कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना बोलत होते. शिवाय विकासकामांना गती देण्यासाठी वारंवार प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले. त्याचबरोबर विदर्भातील विविध विकासकामांचा पाढाही त्यांनी यावेळी वाचून दाखवला.
विदर्भाचा विकास साधण्यासाठी आजवर पदवीधर आमदारांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. शिवाय भारतीय जनता पक्ष जाती-पातीचे राजकारण करत नसून विकासाचे आणि जनतेच्या सेवेचे राजकारण करत आला आहे. त्यामुळे युवकांना रोजगार कसा उपलब्ध करूध देता येईल? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
सरकार बदलल्यामुळे मिहानसारखे प्रकल्प धूळ खात पडले
शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार संदिप जोशी यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी गडकरी विदर्भातील मिहान प्रकल्पावर बोलताना म्हणाले कि, सरकार बदलल्यामुळे मिहानसारखे प्रकल्प धूळ खात पडले आहेत. त्यामुळे युवकांना मिळणारा रोजगारदेखील हिरावला आहे. अशावेळी विदर्भातील विकासाला गती देण्यासाठी आणि युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य नेतृत्व निवडण्याची गरज आहे. पदवीधर निवडणुकीत संदिप जोशी आमदार झाले तर विदर्भातील लाख युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
या कार्यक्रमात गडकरी यांनी विविध विकासात्मक पैलूंवर भाष्य करत भविष्यात रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना देण्याची संकल्पना डोक्यात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविसांसह विदर्भातील सर्वच भाजप आमदार-खासदार उपस्थित होते. फडणवीसांनीही पदवीधरांच्या प्रश्नांसाठी भाजप उमेदवारांना सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले.