नागपूर - जेष्ठ विचारवंत पत्रकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे निधन झाले. वैद्य यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त करत, वैद्य यांना श्रद्धाजंली वाहिली. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वैद्य यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत कांचन गडकरी या देखील उपस्थित होत्या.
मा. गो. वैद्य यांची विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. माझ्या लहानपणापासून बाबुरावजींशी माझा व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला आहे. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद मिळाले आहेत. खरे तर बाबुरावजी शतायुषी होतील, हा ठाम विश्वास होता. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेला. याचे अतीव दुःख असल्याची भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
उद्या (रविवार ता. २०) होणार अंत्यसंस्कार
मा. गो. वैद्य यांच्या पार्थिवावर उद्या (रविवार ता. २०) अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.