नागपूर - केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वात वेगवान मंत्री म्हणून रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. कामाची गती कशी असावी या संदर्भात त्यांच्या कामाचे दाखले संसदेत दिले जातात. मात्र, त्यांच्याच मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय महामार्ग प्राधिकरणाची इमारत तयार होण्यासाठी तब्बल नऊ वर्षांचा कालावधी लागल्याने गडकरी संतापले आहेत. सत्तेत राहून सुद्धा सरकारी अनास्थेचा उत्तम नमुना त्यांच्या समोर आल्याने त्यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शोध निबंध लिहून त्यांचे फोटो त्या इमारतीच्या बाहेर लावावेत, अशा सूचना गडकरींनी केल्या आहेत. ते दिल्ली येथे आयोजित भारतीय महामार्ग प्राधिकरणाच्या इमारत उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
भारतीय महामार्ग प्राधिकरणाच्या इमारत उद्घाटन सोहळ्यात बोलताना नितीन गडकरी अभिनंदन करण्यास लाज वाटते -
एखादे काम किंवा प्रकल्प पूर्ण होतो, त्यावेळी ते काम पूर्ण करणाऱ्या आजी-माजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सार्वजनिकरित्या अभिनंदन करण्याची प्रथा आणि परंपरा आहे. मात्र, जे काम काही वर्षात पूर्ण होणार होते, त्या कामाला तब्बल नऊ वर्षे लागले. मला अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करायलाही लाज वाटते, अशा शब्दात नितीन गडकर यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. अशा बेजबाबदार आणि विघ्न संतोषी अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले. त्यामुळे त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
का आहेत गडकरी नाराज?
२००८ साली या इमारतीचा प्रस्ताव तयात करण्यात आला होता. त्यावेळी हा प्रकल्प ५० कोटी रुपयात पूर्ण केला जाणे अपेक्षित होते. मात्र, २०११ मध्ये याची निविदा निघाली. त्यानंतर हे काम पूर्ण करण्यासाठी नऊ वर्षांचा कालावधी लागला. त्यामुळे निविदेची किंमत देखील वाढली आहे. हे काम पूर्ण होताना बघण्यासाठी दोन सरकारे आणि आठ चेअरमन लागले. एकीकडे १ लाख कोटी रुपये खर्च करून दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्ग दोन वर्षात पूर्ण करण्याचे आपण बोलतो. त्याचवेळी काही कोटींच्या कामाला नऊ वर्षे लागतात. ही बाब नक्कीच अभिनंदन करण्यासारखी नसल्याचे गडकरी म्हणाले. एनएचएआयमध्ये चिटकून बसलेले अकार्यक्षम, कामचुकार आणि भ्रष्ट अधिकारी आपल्या अधिकारांचा गैरफायदा घेऊन कामात विघ्न आणतात. अशा अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.