नागपूर - पेट्रोल पंपावर दरोडा टाकून एका पेट्रोलपंप कर्मचाऱ्याचा खून केल्याची घटना नागपूरच्या हिंगणा तालुक्यात घडली. या घटनेत अज्ञात आरोपींनी झोपेत असलेल्या 2 पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. ज्यामध्ये एका कर्मचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे.
नागपूर : पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांवर अज्ञातांचा प्राणघातक हल्ला, एकाचा मृत्यू - नागपूरमध्ये खून
पेट्रोल पंपावर दरोडा टाकून एका पेट्रोलपंप कर्मचाऱ्याचा खून केल्याची घटना नागपूरच्या हिंगणा तालुक्यात घडली.
पंढरी भांडारकर असे मृत कर्माचाऱ्याचे नाव आहे, तर लीलाधर गोहाटे असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील आऊटर रिंगरोडवरील इंडियन ऑइलच्या उगले पेट्रोल पंपावर आज सकाळी ग्राहक वाहनात पेट्रोल भरण्यासाठी आल्यावर ही घटना उघडकीस आली. रात्री पेट्रोलपंप बंद करून हे दोन्ही कर्मचारी पंपावरच झोपले होते. मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी झोपलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अवजड वस्तूने प्रहार केला. यामध्ये एकाच जागीच मृत्यू झाला. ज्यानंतर आरोपी पेट्रोलपंपाच्या कार्यालयातील रोकड घेऊन पसार झाले. जखमी कर्मचाऱ्याला शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल केले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.