नागपूर - गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शहाराजवळ असलेल्या हिंगणा परिसरातील वेणा नदीत घडली. सुरेश शिवराम फिरके (वय ४८) आणि त्यांचा पुतण्या अजिंक्य रमेश फिरके (वय १८) अशी मृतांची नावे आहेत.
गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू - हिंगणा परिसर
गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले काका -पुतण्याचा नदीत बुडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शहाराजवळ असलेल्या हिंगणा परिसरातील संगम व खरी पन्नासे गावादरम्यान असलेल्या वेणा नदीत घडली.
हिंगणा परिसरातील डिगडोह देवी येथील फिरके कुटुंबीय आणि त्यांच्या शेजारचे दोन कुटुंबीय गणेश विसर्जन करण्यासाठी वेणा नदीवर गेले होते. गणेश विसर्जन आटोपून आंघोळ करताना सुरेश फिरके यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडले. ते पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी अजिंक्यसुद्धा खोल पाण्यात गेला. परंतु, दोघेही पाण्याच्या प्रवाहात स्वतःला सांभाळू न शकल्याने वाहत गेले. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशनच्या निरीक्षक सपना क्षीरसागर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दोघांचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना बोलावण्यात आले आहे. रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह शोधण्यात यश आले आहे. या घटनेमुळे डिगडोह गावावर शोककळा पसरली आहे.