नागपूर -राज्यात चालू असलेल्या कोणत्याही सिंचन प्रकल्पाला स्थगिती दिली नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच विदर्भाच्या विकासासाठी मी कटीबद्ध असून ठरावीक वेळेत सगळी कामे पूर्ण करणार आहे. तसेच २ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात केली. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना असे या योजनेचे नाव आहे. मात्र, या निर्णयानंतर विरोधकांनी सभात्याग केला .
2015 पासून थकीत असणारे कर्ज माफ करणार
शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अटीशिवाय ही कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिला. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे त्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे. विदर्भाच्या विकाससाठी मी कटीबद्ध आहे. सिंचनाची कामे ठरावीक वेळत पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यपालांच्या अभिभाषणाला मुख्यमंत्री आज उत्तर देत होते.
प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालयाची उभारणी करणार
ग्रामीण भागातील लोकांना मुंबईला सारखे यावे लागते. त्यांची राहायची सोय होत नाही. त्यामुळे सारखे मुंबईला हेलपाटे मारु नये यासाठी प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय (CMO)उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. ते कार्यालय डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी कनेक्ट असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
समृद्धी विकास महामार्ग लवकरच पूर्ण करणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच कृषी समृद्धी केंद्रे उभारणार असून, यामाध्यमातून ५ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे काम करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
१) आदिवासी समाजासाठी दरवर्षी बजेटमध्ये लोकसंख्येप्रमाणे तरतूद
२) दुर्गम भागात रस्ते करणार
३) कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी उत्तम धान्य देणार
४) आदिवासींच्या विकासाठी ५०० कोटींची तरदूद करण्यात येणार
६) विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्रजींची मदत लागणार
७) यवतमाळसाठी विशेष निधी
८) १० रुपयामध्ये शिवभोजन ही योजना सुरु करणार, सुरुवातीला ५० ठिकाणी ही योजना सुरु करणार