महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray Vidarbha visit: पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो, अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला नाही-उद्धव ठाकरे

आजपासून उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर वर्षभरानंतर उद्धव ठाकरे भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भाच्या दौऱ्यावर आज जाणार आहेत. ते या दौऱ्यात नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशीमला भेट देणार आहेत. ते यवतमाळमध्ये माध्यमांशी बोलले आहेत.

Uddhav Thackeray visit
उद्धव ठाकरे यांचा दौरा

By

Published : Jul 9, 2023, 7:45 AM IST

Updated : Jul 9, 2023, 1:27 PM IST

उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा

नागपूर :अजितदादांमुळे महाविकास सोडल्याचे सांगणाऱ्यांनी आता बोलावे. पोहरादेवीची व आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो, अमित शाह यांनी २०१९ ला अडीच वर्षे सेनेचा व अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असा शब्द दिला होता. युतीत जे ठरले, ते त्यांनी नाकारले, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहे. आज त्यांनी यवतमाळमध्ये पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

भाजपने आता घरात घुसलेल्या बाजारबुणग्यांना सांभाळावे. मुख्यमंत्री होण्याची अनेकांना सध्या हौस आहे. मुख्यमंत्री झाल्यावर सत्तेच्या साठमारीत जनतेला व शेतकऱ्यांना काय मिळते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या पक्ष फोडला जात नाही, तर पळविला जात आहे, अशी त्यांनी राष्ट्रवादीतील घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. 16 आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

असा आहे दौरा-

दिवस पहिला : सकाळी त्यांचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले असता कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. उद्धव ठाकरे मोटारीने यवतमाळच्या दिशेने रवाना झाले आहेत. दौऱ्यात ते नागपूर, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला या चार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आज (रविवारी) उद्धव ठाकरे यवतमाळ येथे पोहरादेवी येथे दर्शनासाठी जाणार आहेत. पोहरादेवी दर्शन आणि महंतांशी चर्चा केल्यानंतर ते यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत पक्षवाढीच्या संदर्भात चर्चा केल्यानंतर ते वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याशी चर्चा करतील. यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्यानंतर ते दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे संध्याकाळी यवतमाळ येथून रात्री अमरावतीला जातील आणि तिथे रात्री मुक्काम करणार आहेत.


दिवस दुसरा: विदर्भ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे अमरावती आणि अकोलाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेणार आहेत. त्यानंतर ते अमरावती व अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान ते अमरावती वरून नागपूरला येणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची संवाद साधून मुंबईला परवाना होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना हा संकटकाळातून मार्गक्रमण करतो आहे. रोजच्या रोज नेतेमंडळी पक्षाला रामराम करत आहेत. ज्यांच्या खांद्यावर पक्ष वाढीची धुरा होती, तेच नेते पक्षाला सोडून गेल्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा सुरू केला आहे.


विदर्भाकडे लक्ष दिल्यास फायदा होईल का :उद्धव ठाकरे गटाची विदर्भात तशी फार काही ताकत नाही. मात्र, याचं विदर्भाने त्यांना दोन खासदार दिले होते. त्यांच्या पक्षात बंडखोरी झाल्यानंतर वाशीमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने हे शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गट विदर्भात स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत आहे. त्यामुळे आता उध्दव ठाकरे यांनी विदर्भाकडे लक्ष केंद्रित केले आहे.


सुधीर मुनगंटीवार यांची टीका :कोरोनामध्ये उध्दव ठाकरे यांनी राज्याचे दौरे केले असते तर एकनाथ शिंदे आमच्यासोबत आलेच नसते. तेव्हा काहीच केले नाही, घरी बसले. म्हणून आता त्यांना प्रयत्न करावे लागत आहे. शेवटी कधी ना कधी कष्ट करावे लागतात. अगोदर अभ्यास करा, बाकी जीवन सुखाचे आणि त्यांनी पहिले अभ्यास केला नाही. आमच्या शिक्षकांनी अभ्यास करताना हे सूत्र सांगितले होते. त्यांच्या शिक्षकांनी कदाचित त्यांना सांगितले नसावे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

कार्यकर्त्यांना संबोधितही करणार : आज उद्धव ठाकरे अमरावतीत पोहोचणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ते यवतमाळ आणि वाशीमला भेट देणार आहेत. यवतमाळमध्ये ते बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या प्रसिद्ध पोहरादेवी मंदिरालाही भेट देणार आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, ते मुंबईला परत जाण्यापूर्वी नागपूर आणि अकोल्याला भेट देणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, आणि विदर्भातील अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधितही करणार आहेत.

विदर्भातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले :उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मिनी रॅलीचे नियोजन केले आहे. दौऱ्याची तयारी सुरू आहे आणि त्यामुळे विदर्भातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे, असे पक्षाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले. नागपूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचेही मूळ गाव आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील विदर्भातील असून ते मूळचे चंद्रपूरचे आहेत. महाराष्ट्र विधानसभेत सर्वात जास्त जागा विदर्भातून येतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत, भाजपने या प्रदेशातून 29 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने 4 जागा जिंकल्या होत्या.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान! अमरावती शहरात झळकले पोस्टर
  2. Banner In Nagpur : राज-उध्दव एकत्र यावे यासाठी कार्यकर्त्यांनी नागपुरात लावले बॅनर; महाराष्ट्राला तुमची गरज...
  3. Uddhav Thackeray Visit : विदर्भात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; उद्यापासून दौरा सुरू
Last Updated : Jul 9, 2023, 1:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details