नागपूर -क्राईम सिटी अशी ओळख झालेल्या नागपुरात गेल्या महिन्यात १४ खुनी घटनांमध्ये १९ लोकांची हत्या झाली होती. तर आता जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा खून झाला आहे. खापरखेडा येथे मधल्या भावाने लहान भावाची गळा चिरून हत्या केली आहे. तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून गुंडांनी मिळून एका गुंडाचा खून केला आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
भावानेच केला भावाचा खून -
नागपूर ग्रामीण पोलीस विभागाअंतर्गत येत असलेल्या खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहेगाव (रंगारी) येथे पहिली घटना घडली आहे. गीतेश रामदास मानकर (२९) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गीतेशचा खून त्याच्याच भावाने केला असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. गीतेशचे एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. यावरून त्या मुलीच्या भाऊजीनी गीतेशला मारण्याची धमकी दिली होती. ही बाब गीतेशच्या मनाला लागल्याने त्याने घरी परत आल्यानंतर दारू प्राशन केली. त्याच दरम्यान गीतेशचा मधला भाऊ सतीश देखील त्या ठिकाणी आला. तेव्हा गीतेश हा त्याच्या प्रेयसीच्या भाऊजीला मारण्यासाठी जात आल्याचे सतीशच्या लक्षात आले. सतीशने गीतेशला थांबवण्याच्या उद्देशाने एका खोलीत बंद केले. त्यावेळी दोघांमध्येच हाणामारी झाली. तेव्हा रागाच्या भरात सतीशने गीतेश जवळ असलेल्या चाकूने त्याचा गळा चिरून खून केला. घटनेची माहिती समजताच खापरखेडा पोलिसांनी सतीश मानकरला अटक केली आहे.