नागपूर - उपराजधानी नागपुरात महिला अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना पुढे आल्या आहेत. पहिली घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. एका मित्राने अत्याचार केल्यामुळे १६ वर्षीय तरुणीला गर्भ धारणा झाली आहे. तर, दुसऱ्या एका घटनेत घरमालकाने सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी अटक केली.
पहिल्या घटनेतील आरोपी ऋषभ इंदूरकर व १६ वर्षीय पीडितेमध्ये मैत्री होती. कालांतराने दोघांमध्ये जवळीक निर्माण होऊन प्रेम संबंध तयार झाले. ऋषभ याने लग्नाचे आमिष देऊन पीडितेवर अत्याचार केला. त्यामुळे ती चार आठवड्यांची गर्भवती झाली. तिच्या पोटात दुखत असल्याने पीडितेच्या आईने तिला रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याचा खुलासा झाला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपी ऋषभ विरुद्ध तक्रार दाखल केली. ज्याच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.