नागपूर - नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई खैरी शिवारातील वेणा नदीच्या पात्रात दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. मृतकांमध्ये एक युवक आणि एका युवतीचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे दोन्ही मृतदेह अंदाजे 25 ते 30 वयोगटातील आहेत. मृतकांचे हात पाय नायलॉनच्या दोरीने बांधले असून त्याला मोठ्ठा दगड बांधून मृतदेह नदीत फेकून देण्यात आले होते, त्यामुळे हा हत्येचा प्रकार असल्याचे दिसून येत आहे. ( Two dead Bodies were found in Vena river )
नदीत आढळले दोन मृतदेह तरंगताना - वेणा नदीच्या पत्रात एका व्यक्तीला मृतदेह तरंगताना दिसून आल्यानंतर या बाबत बुटीबोरी पोलीस ठाण्याला माहिती कळवण्यात आली. बुटीबोरी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी बुटीबोरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून पोलीस त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.