नागपूर -गेल्या काही दिवसांपासून उपराजधानी नागपुरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. प्रत्येक दिवशी एक हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण पुढे येत असल्यामुळे शासन आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस नागपुरात 'वीकएन्ड कर्फ्यू'चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लोकांनी आणि व्यावसायिकांनी स्वयंशिस्तीने घरात राहून कोरोना विरुद्धच्या लढाईच्या दुसऱ्या टप्प्यात आपले योगदान देणे अपेक्षित आहे. आज(शनिवारी) अगदी सकाळी-सकाळी उघडणारी दुकाने देखील बंद आहेत. सकाळच्या सत्रात नागपूर बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपुरात दोन दिवसीय 'वीकएन्ड कर्फ्यू' - नागपूर वीकएन्ड कर्फ्यू न्यूज
देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. विविध शहरांमध्ये गरजेनुसार लॉकडाऊन करण्यात आले आहे.
नागपूर लॉकडाऊन
उपद्रव शोध पथकाकडून सातत्याने कारवाई -
कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी शहरातील गर्दीच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून नियम मोडणाऱ्या नागरिकांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. तरीदेखील संसर्ग वेगाने होत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून अधिक कडक नियम लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.